उरुळी कांचन, ता. १८ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने एका व्यक्तीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टरचे चाक पायावरून गेल्याने संबंधित व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उसाने भरलेला ट्रॅक्टर जात असताना समोरून आलेल्या व्यक्तीला त्याची धडक बसली. धडकेनंतर ट्रॅक्टरचे चाक संबंधित व्यक्तीच्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमी व्यक्तीला तातडीने उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने आल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीचीही कोंडी झाली होती. अपघाताबाबत अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.







