पुणे : “आम्ही इथले भाई आहोत, मध्ये आलात तर बघा,” असे म्हणत नागरिकांना शिवीगाळ करून कोयता फिरवत दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून निघोजे येथे दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

ओमकार राजकुमार डोंगरे (वय २३, रा. आल्हाटवस्ती, निघोजे) आणि समाधान विजय ढाकणे (वय २२, रा. थिगळेवस्ती, निघोजे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, निघोजे येथील एका चिकन सेंटरसमोर दोन्ही संशयित नागरिकांना शिवीगाळ करत होते. तसेच नागरिकांना दुकानाच्या दिशेने जाण्यापासून अडवले जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी ओमकार डोंगरे याने नागरिकांच्या दिशेने कोयता फिरवत त्यांना धमकावल्याचा आरोप आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. दोन्ही संशयितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.






