मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा कायदेशीर मुद्दा समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात एफआयआर दाखल केल्याची माहिती आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या एफआयआरमध्ये अनेक व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचे सांगितले जात असून, त्यात आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर सतीश सालियन यांच्याकडून आदित्य ठाकरे यांना पुन्हा मानहानीची कायदेशीर नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सतीश सालियन १९ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता आपल्या कायदेशीर पथकासह आदित्य ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे ही नोटीस बजावण्यात येणार आहे.

१६ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टच्या संदर्भात ही नवीन नोटीस देण्यात येणार असल्याचे सतीश सालियन यांच्या बाजूने सांगण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप आपल्यालाच उद्देशून असल्याचा दावा सतीश सालियन यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आपल्याकडे पुरावे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कायदेशीर मार्गाने आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आपल्यावर राजकीय हेतू आणि वैयक्तिक वैमनस्यातून आरोप केले जात असल्याचा आक्षेप सतीश सालियन यांनी घेतला आहे. नोटीस बजावण्यासाठी जाताना अडथळा किंवा सुरक्षेचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी स्वतःसह कायदेशीर पथकाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणात निष्पक्ष आणि कायदेशीर चौकशीसाठी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिशा सालियन यांच्याशी आपली कधीही भेट किंवा ओळख झाली नसल्याचे म्हटले आहे. गेल्या सहा वर्षांपासून राजकीय हेतूने आणि वैयक्तिक द्वेषातून आपले नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारच्या आरोपांना तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच अधिकृत यंत्रणांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे करण्यात येत असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे आता लक्ष लागले आहे.






