संदीप बोडके
पुणे, ता. 14 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ”मिनी रंगीत तालीम” म्हणून हवेली तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक समजली जाते. या निवडणुकीत हवेली तालुक्यातील अनेक कोट्याधीश उमेदवार प्रतिष्ठेसाठी रिंगणात उतरल्याने, मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रती मताला 3 ते 5 लाखांपर्यंत बाजार फुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीच्या घमासानावरून पीडीसीसी बँकेच्या संभाव्य उमेदवारांची झुंज ठरणार आहे. राजकीय प्रतिष्ठेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आर्थिक ‘पत’ नसलेल्या हवेली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही गटातील दिग्गज व मातब्बरांनी शड्डू ठोकला असून करोडो रुपयांची यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यास्तरावरील राजकीय पकड कायम ठेवण्यासाठी मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाची ही निवडणूक ‘अण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनल’ आणि ‘सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनल’ यांच्यात होत आहे. दोन्ही पॅनलच्या मागे सहकार, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा पातळीवरील राजकारणातील अनुभवी नेत्यांची ताकद उभी आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ खरेदी-विक्री संघाच्या सत्तेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तालुक्यातील सहकार क्षेत्रावरील वर्चस्वाची लढाई बनली आहे.
दांगट-जगताप-गोते यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक विकास दांगट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप गोते यांच्या नेतृत्वाखाली ‘अण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनल’ निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. सहकारातील अनुभव, स्थानिक राजकीय संपर्क आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा या जोरावर या पॅनलकडून प्रचाराची रणनीती आखली जात आहे.

मस्के-घुले-काळभोर-कंद यांची प्रतिष्ठा पणाला
दुसरीकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश मस्के, ज्येष्ठ नेते सुरेश घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या नेत्यांच्या राजकीय अनुभवामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

सोसायट्यांचे संख्याबळ ठरणार राजकीय ताकदीची कसोटी!
खरेदी विक्री संघाच्या निवडणूक निकालाद्वारे कोणाच्या ताब्यात किती सोसायट्या आहेत? आणि त्याद्वारे तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील हुकमी एक्का कोण?याचा अंदाज येणार आहे. तसेच राजकीय भवितव्याची दिशा व गटाचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी, खरेदी विक्री संघावर आपलीच सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून ”मनी पावर” आणि ”मसल पावर”चा जोरदार वापर सुरु आहे. निवडणुकीत मर्यादित मतदारसंख्या असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पॅनल प्रमुखांची विशेष आर्थिक रसद आणि उमेदवारांची कोट्यावधीची उलाढाल यामुळे भर रंगात आलेल्या या निवडणुकीत दोन्ही गटाकडून 3 ते 5 लाखांच्या ‘मताच्या बाजार भावाची टस्सल’ चालू आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.
पीडीसीसीच्या राजकारणाची दिशा ठरणार?
हवेलीच्या राजकारणात ‘दादा’, ‘नाना’, ‘अप्पा’ आणि ‘अण्णा’ अशा विविध नेतृत्वांच्या राजकीय समीकरणांना या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, सहकार क्षेत्रातील ‘प्रकाश’ नावाभोवतीही आगामी पीडीसीसी बँकेच्या राजकारणाची चर्चा केंद्रित झाली आहे. त्यामुळे खरेदी-विक्री संघाच्या निकालानंतर सहकारातील नेतृत्वाचे संख्याबळ, गटांचे राजकीय अस्तित्व आणि आगामी बँक निवडणुकीतील संभाव्य समीकरणे ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार आहेत.
दरम्यान, एकीकडे ‘प्रकाश दादा’ यांचे नेतृत्व, तर दुसरीकडे ‘प्रकाश अप्पा’ यांचे राजकीय वजन अशा चर्चांनी हवेलीतील सहकार क्षेत्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, या निवडणुकीत मतदार कोणत्या पॅनलला कौल देतात आणि त्यातून आगामी पीडीसीसी बँकेच्या राजकारणाला कोणती दिशा मिळते, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.







