पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. सुमारे पावणे दोन तास चाललेल्या या बैठकीत राजकीय घडामोडींवर खलबते झाल्याची माहिती समोर येत आहे.

या भेटीची अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी मिळालेल्या माहितीनुसार भेटीत सुरवातीला ऊर्जा विभाग आणि महाजेनको संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्यावरही सविस्तर चर्चा झाल्याचे समोर आले आहे . सुनेत्रा पवार गटातील काही आमदार शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सुमारे 22 ते 26 आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा अंदाज वर्तवला जात असून, ही संख्या महायुतीसाठी चिंतेची ठरू शकते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आमदारांच्या भूमिकेबाबत चर्चा केली आणि काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. विलीनीकरणाला आमचा विरोध नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते.
दुसरीकडे, या विलीनीकरणाच्या चर्चेवर पक्षातील नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये समोर येत आहेत. सुनील तटकरे यांनी अजित पवार विलीनीकरणासाठी इच्छुक असल्याचा दावा केला असून, विलीनीकरणाची तारीखही ठरल्याचे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी, विलीनीकरणाची योग्य वेळ आल्यावर त्याबद्दल माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

मात्र, शरद पवार गटाकडून यावर वेगळीच भूमिका मांडली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही विलीनीकरणाची चर्चा एकतर्फी सुरू असल्याचे म्हटले आहे. अजित पवार पक्ष सोडून गेले त्याच दिवशी आमच्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपल्याचे सांगत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आता या राजकीय घडामोडींमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवीन समीकरणे तयार होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.







