पुणे : पुण्यात जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांची शेती हडपल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भोर तालुक्यातील सांगवी आणि साळुंगण गावांत हा प्रकार घडला असून, याप्रकरणी ‘नाईक एन्व्हायर्नमेंट इन्स्टिट्यूट लिमिटेड’चे चेअरमन कमांडर दीपक दिगंबर नाईक यांच्यासह 8 जणांवर भोर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संदीप तुकाराम जगताप यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सांगवी आणि साळुंगण परिसरातील अनेक गट क्रमांकांची वडिलोपार्जित जमीन त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची आहे. कुटुंबातील काही सदस्यांनी जमीन विकण्यास स्पष्ट विरोध केला होता, तरीही कोणतीही मंजुरी किंवा मोबदला न देता परस्पर खरेदीखत तयार करण्यात आले आणि सातबारा उताऱ्यावर इतर लोकांची नावे चढवण्यात आली.
हा घोटाळा कसा उघडकीस आला?

वर्ष 2013-14 च्या सुमारास काही लोक जमिनीवर तार कंपाउंड करण्यासाठी आले होते. तेव्हा विचारणा केल्यावर ही जमीन दीपक दिगंबर नाईक यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. यानंतर शेतकऱ्यांनी कसून चौकशी सुरू केली. शशिकांत रामभाऊ कंक आणि बाजीराव शिळीमकर यांनी शेतकऱ्यांना, “तुमच्या नावावर जास्त जमीन असल्यास वनविभागाचा शिक्का पडेल,” अशी खोटी भीती दाखवली. त्यानंतर खातेफोड करून देण्याच्या बहाण्याने त्यांना भोर तहसील कार्यालयात नेऊन त्यांच्या सह्या व अंगठे घेण्यात आले.

फिर्यादीने दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदीखतांच्या प्रती काढून पाहिल्या असता धक्कादायक प्रकार समोर आला. काही जिवंत व्यक्तींच्या जागी दुसऱ्याच व्यक्तींना उभे करून अंगठे घेण्यात आले, तर मृत व्यक्तींच्या जागी त्यांच्या नातेवाइकांच्या खोट्या सह्या केल्याचे उघड झाले. तसेच, शशिकांत रामभाऊ कंक यांनी कुलमुखत्यारपत्रधारक म्हणून सही करत मूळ मालकांच्या संमतीशिवाय जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप आहे.
या घोटाळ्यात सांगवी (गट क्रमांक 73, 74, 40/1,45, 53/1, 48, 46) आणि साळुंगण (गट क्रमांक 2, 1/10, 1/4, 1/7, 3, 19 येथील जमिनींचा समावेश आहे. फेरफार क्रमांक 375 नुसार सांगवीतील काही जमिनी अमोल पांडुरंग पाटील यांच्या नावावर झाल्या असून, त्यापैकी काही भाग पुढे इतरांना विकल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.






