पुणे, ता. १३ : महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे गुटखा आणि भेसळयुक्त पदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी उघडपणे सुरू असलेली गुटख्याची विक्री कमी झाल्याचे नागरिक सांगत असून, रस्त्यांवर सर्वत्र दिसणाऱ्या गुटख्याच्या पिचकाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटल्याची चर्चा आहे.

कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा आणि बंदी असलेल्या उत्पादनांविरोधात कठोर भूमिका घेतली. राज्यभर सुरू असलेल्या तपासण्या, छापेमारी आणि कारवाईमुळे अनेक विक्रेत्यांनी अवैध साठा हटविल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ टाकून देण्यात आल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. यापूर्वी पानटपऱ्या आणि किरकोळ दुकानांमध्ये सहज उपलब्ध होणारा गुटखा आता अनेक भागांत उघडपणे विक्रीस ठेवला जात नसल्याचे नागरिकांचे निरीक्षण आहे. गुटखा आढळल्यास थेट गुन्हा दाखल होऊ शकतो आणि संबंधित दुकानावर कठोर कारवाई होऊ शकते, या भीतीमुळे अनेक विक्रेते सावध झाल्याचे सांगितले जात आहे.

याचबरोबर भेसळयुक्त पदार्थ तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या साखळीवरही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने अन्न व औषध प्रशासनाची यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. राज्यभर सुरू असलेल्या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून, “ही मोहीम सातत्याने सुरू राहावी,” अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तथापि, काही भागांत अजूनही बंदी असलेल्या गुटख्याची चोरट्या मार्गाने आणि अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशा विक्रेत्यांवरही कठोर कारवाई करून अवैध विक्री पूर्णपणे बंद व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, एकेकाळी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला, शासकीय कार्यालयांच्या परिसरात आणि भिंतींवर गुटख्याच्या पिचकाऱ्यांचे डाग सर्वत्र दिसत होते. मात्र, अलीकडील कारवाईनंतर अनेक ठिकाणी हे दृश्य बदलल्याचे नागरिक सांगत आहेत. स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा सकारात्मक बदल कायम राहावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.







