पुणे: पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ज्या मुलाला मोठ्या स्वप्नांनी आणि अपार कष्टाने इंजिनिअर बनवले, त्याच मुलाने व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या वृद्ध आई-वडिलांचे जगणे नरकमय केले आहे. या छळाला कंटाळून या वृद्ध दांपत्याला घर सोडून मंदिर आणि सार्वजनिक उद्यानांमध्ये आश्रय घेण्याची वेळ आली होती.

रमेश (वय 58) आणि रेखा (वय 53) या पालकांनी आपला 28 वर्षांचा मुलगा राज याला उच्चशिक्षित केले. मात्र, शिक्षणांनंतर त्याने नोकरी करण्याऐवजी व्यसनाचा रस्ता धरला. तो दररोज पैशांसाठी आई-वडिलांकडे तगादा लावत असे. पैसे न दिल्यास तो त्यांना शिवीगाळ करायचा आणि अमानुष मारहाण करायचा.

मुलाच्या दहशतीमुळे हे वृद्ध दांपत्य घरापेक्षा रस्त्यांवर आणि बागांमध्ये अधिक वेळ घालवू लागले होते. एवढेच नव्हे तर, मुलाने पालकांच्या नकळत त्यांच्या नावावर ऑनलाइन कर्जही काढून ठेवले होते, ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक संकट अधिकच गडद झाले. मुलाच्या सततच्या छळाला कंटाळून शेवटी आईने कायदेशीर मार्गाचा अवलंब करत असून मुलाविरुद्ध ॲड. कमलेश दिवेकर यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई सुरु आहे. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. बी. पाटील यांनी वारजे माळवाडी पोलिसांना वृद्ध पालकांना मुलापासून संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.







