पुणे: सोशल मीडियावर सध्या एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, 25 ऑगस्ट 2026 पासून भारतात इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात येणार आहे. या दाव्यामुळे इन्स्टाग्राम वापरणाऱ्या अनेक युजर्समध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती. मात्र, या व्हायरल मेसेजमधील माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक विभागाने या दाव्याची पडताळणी केली असून, इन्स्टाग्राम बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

PIB फॅक्ट चेकने सांगितले की, सोशल मीडियावर फिरणारा हा संदेश खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. भारत सरकारकडून इन्स्टाग्रामवर बंदी घालण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. व्हायरल मेसेजमध्ये काही आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह माहिती पसरवल्यामुळे सरकार इन्स्टाग्रामवर कारवाई करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तपासानंतर हा दावा निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहा पोस्ट:
सोशल मीडिया पर एक पोस्ट साझा कर दावा किया जा रहा है कि भारत सरकार द्वारा 25 अगस्त 2026 की रात से भारत में #Instagram पर प्रतिबंध लगा दिया जाएगा।#PIBFactCheck
❌ यह दावा #फर्जी है।
✅ भारत सरकार द्वारा ऐसी कोई घोषणा नहीं की गई है।
⚠️कृपया सतर्क रहें और ऐसे भ्रामक दावों के… pic.twitter.com/6v9Dz8bdUV
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 27, 2026
इन्स्टाग्राम हे भारतातील लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांमुळे मोठ्या संख्येने वापरकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रशासनाने नागरिकांना अशा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे गरजेचे आहे. सरकारशी संबंधित निर्णय किंवा महत्त्वाच्या घोषणांसाठी नागरिकांनी केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, इन्स्टाग्राम बंद होणार असल्याची चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याने युजर्सनी दिलासा घेतला आहे.






