राहुलकुमार अवचट

यवत: जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी आता यवत सोडून वरवंडकडे मार्गस्थ झाली. यावेळी वाटेत वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्र येथे घुंगरांचा छन-छनाट व टाळ-मृदुंगाच्या तालावर ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करत भक्तिगीत व लावणीचा अनोखा संगम हजारो वारकऱ्यांनी अनुभवला.

यवत येथील मुक्काम आटोपून सकाळी ०८.३० च्या सुमारास पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम वरवंड येथे असून, वाटेत येणाऱ्या लावणी कला केंद्रात अनेक वारकऱ्यांनी भक्तिगीतांवर ताल धरत पालखीत आलेला शीण कमी केला.
घुंगरांचा छनछनाट अन् टाळ-मृदुंगाच्या नादासोबत भक्तिमय वातावरणात आज वारकऱ्यांनी भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अनुभव घेत हरिनामात तल्लीन झाले.
दौंड तालुक्यातील चौफुला परिसरातील वाखारी येथील लावणीसाठी प्रसिद्ध असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रातील नृत्यांगनांनी विठुरायाच्या भक्तिगीतांवर टाळ-मृदुंगाच्या गजरात ताल धरत भक्तिगीतांसोबतच लावणीही सादर केली. नृत्यांगनांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून वारकऱ्यांमार्फत आपली सेवा विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी पोहोचविली. यावेळी पायी चालत असलेल्या अनेक वारकऱ्यांचा आलेला थकवा काही अंशी निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.
टाळ व चाळ दोन्हीचा एकत्रित संगम
टाळ आणि चाळ ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची दोन वेगवेगळी परंपरा असून, दोन्हीचा साज आणि बाज अगदी वेगळा आहे. परंतु दरवर्षी पालखीच्या निमित्ताने या दोन्हींचा एक अनोखा संगम वाखारी येथे पाहायला मिळतो.
गेल्या अनेक वर्षांपासून न्यू अंबिका कला केंद्राच्या नृत्यांगना वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात. गेल्या अनेक वर्षांची परंपरा डॉ. अशोक जाधव व जयश्री जाधव यांनी आजही कायम जपली आहे. पालखी स्वागताचे हे ३४ वे वर्ष असून, यावेळी १२ हजार वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती न्यू अंबिका कला केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक जाधव यांनी दिली.
यावेळी कला केंद्राच्या संचालिका जयश्री जाधव यांनी प्रत्येकाला सुख, समाधान व समृद्धी लाभू दे, सर्वांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करत, दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी येतात तेव्हा दसरा-दिवाळी सणांसारखा खूप आनंद होत असल्याचे सांगितले.
दरवर्षी आषाढ महिना सुरू झाला की येथील नृत्यांगनांनाही वारीचे वेध लागतात. आम्ही पंढरपूरला वारीबरोबर जाऊ शकत नाही, परंतु वारकऱ्यांच्या रूपाने पांडुरंगच आपल्याकडे येत असून, वारकरी बांधवांना आम्ही स्वतःच्या हातांनी महाप्रसाद वाढतो. तेव्हा साक्षात पांडुरंगाला भेटल्यासारखे वाटते. पालखीच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळत असल्याची भावना यावेळी येथील नृत्यांगनांनी व्यक्त केली.







