पुणे: पुणे शहरात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादांचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. अशाच एका घटनेत शनिवारवाडा परिसरात एका डिलिव्हरी बॉयने रस्त्यावर एका महिलेसोबत वाद घालत तिच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यासोबतही त्याने अरेरावी करत धक्काबुक्की केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25जुलै 2026 रोजी आर्यन सावंत नावाचा तरुण दुचाकीवरून शनिवारवाडा परिसरातून जात होता. यावेळी त्याचा एका महिलेसोबत काही कारणावरून वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर त्याने महिलेशी शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या कसबा पेठ पोलीस चौकीतील हवालदार वैभव येसादे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही बाजू समजून घेत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याचा राग आल्याने आर्यन सावंत याने हवालदार येसादे यांच्याशीच वाद घातल्याचे सांगितले जात आहे.

आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण केला, असा आरोप आहे. तसेच, त्याने स्वतः नुकताच तुरुंगातून बाहेर आल्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर हवालदार वैभव येसादे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी कारवाई करत आरोपी डिलिव्हरी बॉयविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.







