पुणे: नीट पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मोठे रूप धारण केले होते. दिल्लीतील जंतर-मंतर येथे लाखो विद्यार्थी आणि पालक एकत्र येत परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी करत रस्त्यावर उतरले. महिनाभर सुरू राहिलेल्या या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतले. मात्र, ही घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्रात एमपीएससीच्या परीक्षेच्या पेपरफुटीचा गंभीर आरोप समोर आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या कथित पेपरफुटीबाबत गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, २२ मार्च रोजी झालेल्या राज्य औषध निरीक्षक पदाच्या एमपीएससी परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच काही जणांच्या हाती पोहोचला होता.

रोहित पवार यांनी दावा केला की, नंदूरबारमधील एका खासगी अकॅडमीतून ही पेपरफुटी झाली. या प्रकरणात संबंधित व्यक्तीने एका परीक्षार्थ्याच्या पालकाकडून प्रश्नपत्रिका देण्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यापैकी ५ लाख रुपये आगाऊ घेण्यात आले, तर उर्वरित रक्कम परीक्षा झाल्यानंतर देण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या माहितीनुसार, परीक्षेच्या दोन दिवस आधी संबंधित विद्यार्थ्याला व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिकेतील सुमारे १०० पैकी ९० प्रश्न पाठवण्यात आले होते. संदेश पाहिल्यानंतर तो डिलिट केला जात असल्याने पुरावा राहू नये, अशी खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, पुरावा जतन करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने ते पीडीएफ आपल्या मित्राला फॉरवर्ड केल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा पवार यांनी केला.
याशिवाय या परीक्षेत राज्यातील एका नायब तहसीलदाराच्या मुलगा आणि मुलीने अनुक्रमे १३ वा आणि १६ वा क्रमांक मिळवल्याचाही उल्लेख त्यांनी पत्रकार परिषदेत केला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या आरोपांवर संबंधित यंत्रणांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.







