उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या व नामांकित महाविद्यालयाच्या शेजारील ‘जिजाऊ सभागृह’ परिसरसह कॅफे सध्या अल्पवयीन मुला-मुलींच्या येड्या चाळ्यांचा आणि टवाळखोरांचा मुख्य अड्डा बनला आहे. या ठिकाणी असलेल्या प्रशस्त पार्किंगचा फायदा घेत, काळ्या काचा लावलेल्या आलिशान चारचाकी गाड्यांमधून उघड्यावर अश्लील चाळे केले जात असल्याने परिसरातील नागरिक आणि पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शाळकरी मुले-मुली, विद्यार्थिनी आणि नागरिक दररोज याच मार्गाने ये-जा करत असतानाही उरुळी कांचन पोलिसांकडून या टवाळखोरांना कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. जिजाऊ सभागृहाच्या मोकळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात चारचाकी गाड्या पार्क केल्या जातात. या सभागृहाच्या आवारातच खाजगी क्लासेसही भरवले जातात. या क्लासेसच्या व शाळेच्या वेळेत काळ्या काचा केलेल्या, फॅन्सी व चुकीच्या नंबरप्लेट असलेल्या गाड्या घेऊन काही टवाळखोर तरुण या परिसरात गाड्यांसह येऊन थांबतात.

शाळा-कॉलेज सुटल्यानंतर मुलींना या काळ्या काचांच्या गाड्यांमध्ये बसवून अश्लील चाळे केले जातात, असे उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. या हुल्लडबाजीमुळे परिसरात अत्यंत अश्लील व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, उरुळी कांचन पोलिसांची कोणतीही गस्त किंवा पोलीस कर्मचारी या परिसरात फिरकत नाहीत.

वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या, काळ्या काचा असलेल्या आणि बोगस नंबरप्लेट लावलेल्या गाड्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ‘पोलिसांनीच या टवाळखोरांना सुट दिली आहे का?’ असा थेट सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या मार्गावरून शेकडो विद्यार्थिनी दररोज ये-जा करतात. अशा मोकाट व बे हुल्लड तरुणांमुळे एखाद्या मुलीची छेडछाड होणे किंवा कोणतीही मोठी अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाण्याने आणि ग्रामपंचायतीने जिजाऊ सभागृह परिसरातील या अश्लील चाळ्यांना व काळ्या काचांच्या गाड्यांना तत्काळ अटकाव घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार म्हणाल्या, “जिजाऊ सभागृह परिसरात थांबणाऱ्या टवाळखोर व काळ्या काचा असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी गस्त लावण्यात येणार असून अशांवर यापुढे कारवाई सुरूच राहणार आहे.”







