पुणे, ता. 08 : कर्तव्यावर विनापरवाना गैरहजर असताना दारूच्या नशेत एका तरुणीचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे स्पष्ट करत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी संबंधित हवालदाराला निलंबित केले आहे.

बबन अशोक वाघ असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता. मात्र, 17 जुलै 2026 पासून तो कोणतीही परवानगी न घेता कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समोर आले आहे. 4 सप्टेंबर रोजी बबन वाघ याने दारूच्या नशेत एका तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर संबंधित तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी बबन वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पोलीस हवालदारासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारचे कृत्य झाल्याने पोलीस दलातही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. चतु:श्रृंगी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा अहवाल शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी संपूर्ण प्रकाराची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाला दिली.

दरम्यान, कर्तव्यावर विनापरवाना गैरहजर राहणे आणि त्यानंतर दारूच्या नशेत तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली, असे नमूद करत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी बबन वाघ याच्यावर निलंबनाची कारवाई केली.







