पुणे, ता. 30: खानापूर (ता. हवेली) येथील सराफ दुकानावर दिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीचा अवघ्या 48 तासात पर्दाफाश करण्यात जिल्हा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा, हवेली व वेल्हे पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 70 लाख 32 हजार रुपयांचे तब्बल 56 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. अशी महिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीनांसह 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

अंकुश दगडु कचरे (वय-20, व्यवसाय ड्रायव्हर, सध्या रा. जैन मंदिराजवळ, साईनगर कात्रज, पुणे, मुळ रा. रा. सिंगापूर मोहरी, पो. वरोती, ता. वेल्हे), व गणेश भांबु कचरे (वय -23, रा. जैन मंदिर, वाघजाईनगर कात्रज, पुणे, मुळ रा. हारपुड, पो. वरोती, ता. वेल्हे जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना सिंगापूर डोंगरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 26) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाच अनोळखी दरोडेखोरांनी तलवार, कोयता आदी शस्त्रांच्या धाकाने खानापूर येथील सराफ दुकानात सशस्त्र दरोडा टाकला होता. दुकानातील मालक व महिला कामगारांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी दागिने व रोख रक्कम लुटली होती. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल व अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची विशेष तपास पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला.
ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. दरोडेखोर यांनी दोन्ही मोटार सायकल वेगवेगळ्या रस्त्याने वेल्हे गावाच्या दिशेने नेल्याची माहिती प्राप्त झाली. तपास पथकांनी सलग दोन दिवस, दिवस-रात्र तपास केला. त्यानंतर गुन्ह्यातील मोटार सायकल घेवून दरोडेखोर हे वेल्हे तालुक्यातील सिंगापूर डोंगरात जंगलाकडे गेल्या असल्याचे निष्पन्न झाले.
गोपनीय बातमीदार सतर्क करण्यात आले असता, पथकाच्या गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार अमोल शेडगे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंकुश कचरे हा असून त्याने त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने गुन्हा केला आहे. त्यानुसार अंकुश दादू कचरे व गणेश भाऊ कचरे यांना सिंगापूर डोंगरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी अन्य तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या मदतीने दरोडा केल्याची कबुली दिली.
दरम्यान, आरोपींकडून दरोड्यात वापरलेला कोयता तसेच 70 लाख 32 हजार रुपयांचे तब्बल 56 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 4 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अंकुश दगडु कचरे याच्यावर यापूर्वीही तीन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेलीच्या निरीक्षक वैशाली पाटील, वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पासलकर, शितल टेंबे, संजय सुतनासे, सुभाष गिरे, दिलीपराव शिंदे, पोलीस अंमलदार रामदास बाबर, अमोल शेडगे, मंगेश थिगळे, मंगेश भगत, तुषार भोईटे, सागर नामदास, गणेश धनवे, संतोष तोडकर, संतोष भापकर, युवराज सोमवंशी, राजु मोमीण, योगेश नागरगोजे, राहूल पवार, दिपक साबळे, संदिप वारे, भारत मोहोळ, अतुल डेरे, अक्षय नवले, सचिन गुंड, दिपक गायकवाड, चालक बाळासाहेब पुंड, चालक अजय देडे, विजय मारणे, अशोक तारू, अजय पाटसकर, समाधान चोरमले, ऋषिकेश गायकवाड, अनिकेत काळे, स्वप्निल साळुंखे, प्रशांत दरेकर, रमेश फडतरे, विजय कांबळे, चालक दिलीप आंबेकर राजेंद्र आवदे, रोहित मरभळ, आकाश पाटील, चालक सोमनाथ जाधव, स्वप्निल साळुंखे, निलम निकम, स्नेहल कामठे, पोलीस पाटील गणेश सपकाळ होमगार्ड विजय कटके यांनी केली आहे.






