पुणे: पुण्यातील गोखलेनगर परिसरात प्रेमसंबंधांच्या वादातून एका तरुणाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांवरून निर्माण झालेल्या वादातून 23 वर्षीय तरुणावर बेसबॉल स्टिकने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तिन्ही आरोपींना नवी मुंबईतून अटक केली आहे.

मृत तरुणाचे नाव हर्ष मच्छिंद्र जाधव (वय 23) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हर्ष आणि आरोपी अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे व माऊली देवकर हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मात्र, गेल्या 6 महिन्यांपासून एका तरुणीसोबतच्या प्रेमसंबंधांवरून त्यांच्यात सतत वाद सुरू होते. या कारणामुळे मित्रांमधील संबंध बिघडत गेले आणि त्यातून वैर निर्माण झाले.

घटनेच्या दोन दिवसांपूर्वी हर्ष मद्यधुंद अवस्थेत आरोपींपैकी एका मित्राच्या घरी गेला होता. तेथे त्याने संबंधित तरुणीच्या विषयावरून वाद घालत गोंधळ घातल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी त्याच्याविरुद्ध कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

यानंतर आरोपींनी हर्षला गाठून त्याच्यावर बेसबॉल स्टिकने जोरदार हल्ला केला. डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर मार लागल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. स्थानिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
हर्षच्या मृत्यूनंतर आरोपींनी पुण्यातून पलायन केले. चतुःशृंगी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यांचा माग काढत नवी मुंबईतून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, प्रेमप्रकरणातून घडलेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.







