पुणे : गणेशोत्सवाच्या नावाखाली सुरू असलेला कर्णकर्कश डीजेचा दणदणाट आता अजिबात सहन करणार नाही. प्रशासनाने ध्वनिमर्यादेची कठोर अंमलबजावणी करून डीजेवर बंदी घालावी; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा निर्वाणीचा इशारा देत, ‘गणेशोत्सव भक्तीचा की ध्वनिप्रदूषणाचा?’ असा संतप्त सवाल उपस्थित करीत पुणेकरांनी डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी एल्गार पुकारला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय दिला आहे.

पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आपले मत मांडताना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वादापासून दूर राहण्याचे आवाहन केले. “डीजेच्या नको त्या वादात पडण्याऐवजी आपले सण आणि सांस्कृतिक कार्यक्रम परंपरेनुसार, सनदशीर व शांततापूर्ण मार्गाने साजरे करावेत,” असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला.

उत्सवांचे मूळ स्वरूप जपले जावे आणि कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने आनंद साजरा व्हावा, यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष भर दिला. त्यामुळे या सर्व प्रकरणात सामाजिक शांतता आणि पारंपरिक संस्कृती टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट होते

सध्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यावरून समाजात बराच वाद पेटल्याचे दिसून येत आहे. डीजेच्या अतिवापरामुळे होणारा प्रचंड आवाज आणि त्रास लक्षात घेता, त्यावर पूर्णपणे बंदी घालावी, अशी जोरदार मागणी अनेक घटकांकडून केली जात आहे. याच तापलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.







