पुणे : गणेशोत्सव आणि मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेने नागरिकांसाठी शहरातील २६ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह उपनगरांतून मोठ्या संख्येने नागरिक मध्यवर्ती भागात येण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे.

पुण्यात गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होत असून, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. गणेशोत्सवातील देखावे, रोषणाई आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, छत्रपती शिवाजी महाराज आखाडा वाहनतळ, गोखले प्रशाला, एआयएसएसएमएस मैदान-आरटीओ चौक, एस. पी. कॉलेज, पेशवे पार्क-सारसबाग, पाटील प्लाझा, बीएमसीसी कॉलेज मैदान, आबासाहेब गरवारे कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, मराठवाडा कॉलेज, काँग्रेस हाऊस रस्ता आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता यांसह विविध ठिकाणी वाहनतळ उपलब्ध राहणार आहेत.

तसेच नदीपात्रातील भिडे पूल ते गाडगीळ पूल परिसरातही दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. काही वाहनतळ केवळ दुचाकींसाठी राखीव असून, काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी अशा दोन्ही वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
गणेशोत्सवातील रोषणाई, देखावे आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर किंवा अनधिकृत ठिकाणी वाहने उभी करू नयेत. नागरिकांनी केवळ निर्धारित वाहनतळांवरच वाहने पार्क करावीत, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असेही वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.







