हडपसर, ता. १९ : काळेपडळ परिसरात दिवसाढवळ्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ७८ वर्षीय वृद्ध महिलेचे सुमारे पाच तोळे वजनाचे आणि सध्याच्या बाजारभावानुसार साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हडपसर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मारुती देवीदास जाधव (वय ४४, व्यवसाय वकील, रा. महालक्ष्मी निवास, केतकेश्वर कॉलनी, काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबासोबत त्यांची ७८ वर्षीय आई पमाबाई जाधव या तळमजल्यावरील घरात एकट्याच राहत होत्या. पमाबाई जाधव यांनी नेहमीप्रमाणे १६ जून रोजी रात्री घरातील लाईट बोर्डवरील पंख्याच्या बटणाला त्यांचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अडकवून ठेवले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ते गंठण जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी संपूर्ण घरात शोधाशोध केली; मात्र गंठण मिळून आले नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा उघडा दरवाजा पाहून आत प्रवेश करत संधी साधून हे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खात्री झाली.

चोरीस गेलेले गंठण सुमारे ५० ग्रॅम वजनाचे असून त्यामध्ये सोन्याची जाड साखळी, सोन्याचे मणी आणि काळे मणी आहेत. सुमारे ३५ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या या दागिन्याची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत अंदाजे साडेसात लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, १६ जून रोजी रात्री ९ ते १७ जून रोजी सकाळी १० या कालावधीत ही चोरी झाल्याचा अंदाज असून, हडपसर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.







