पुणे: पुणे-सातारा महामार्गालगतच्या आर्वी गावात कौटुंबिक वादाचे पर्यवसान एका धक्कादायक हत्येत झाले आहे. घरगुती कारणांवरून सुरू असलेल्या वादातून पतीने आपल्या 25 वर्षीय पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे भोर तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा अक्षय तावरे (वय 25, रा. आर्वी) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती अक्षय रामदास तावरे (वय 28) याच्यावर खुनाचा आरोप आहे. दोघांचे लग्न झाल्यानंतर काही काळापासून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच आरोपी पती पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले आहे.

गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात अक्षय तावरे याने घरातील ओढणी घेऊन ऋतुजाच्या गळ्याभोवती आवळली. गळा आवळल्यामुळे ऋतुजाचा श्वास गुदमरला आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने प्रयत्न केले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
घटनेची माहिती मिळताच ऋतुजाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तिचा भाऊ अनिकेत दादासाहेब पवार यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पती अक्षय तावरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली. किरकोळ कौटुंबिक वादातून एका तरुण विवाहितेचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.







