बारामती : बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने आघाडी घेतली आहे. निंबूत-खंडाळा गटातील अभिजीत काकडे, प्रमोद काकडे आणि वसंतराव दगडे हे तिन्ही उमेदवार विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी ब वर्ग गटातून संग्राम सोरटे यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने आतापर्यंत २१ पैकी चार जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून स्वतंत्र पॅनल उभे करणारे कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.

शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर रविवारी मतमोजणीला सुरुवात झाली. सध्या गट क्रमांक दोनची मतमोजणी सुरू असून, पुरुषोत्तम जगताप जवळपास दीड हजार मतांनी पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या २१ संचालकपदांसाठी ही निवडणूक झाली. पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या मदतीने पॅनल उभे केले होते. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखालीही स्वतंत्र पॅनल मैदानात होते.

मतमोजणी सुरू असताना सुनेत्रा पवार यांनी आपल्या पॅनलचा २१-० असा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, अंतिम निकालासाठी सर्व जागांची मतमोजणी पूर्ण होणे आवश्यक आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सोमेश्वर कारखान्याची ही पहिलीच निवडणूक असल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक शांततेत पार पाडावी, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
आता उर्वरित जागांच्या मतमोजणीत काय निकाल लागतो आणि पुरुषोत्तम जगताप पिछाडी भरून काढतात का, याकडे बारामतीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






