दौंड : बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर लोकभावनेचा अनादर करत “या घटनेला सर्वस्वी पत्रकार कारणीभूत आहेत. पत्रकार आग लावण्याचे काम करत आहेत.” असे वक्तव्य बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे सांनी केले आहे. एवढंच नव्हे तर. “तू अशा बातम्या देत आहेस, की जणू काही अत्याचार आपल्यावरच झाला आहे,” असे शब्द वामन म्हात्रे यांनी बदलापूर येथे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या महिला पत्रकार यांना उद्देशून वापरले.
वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याचा प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड तालुका यांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. बदलापूर येथे झालेल्या बाल लैंगिक अत्याचाराचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या “सकाळ ” वृत्तपत्र डिजिटल चॅनेलच्या महिला पत्रकारास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अपमानजनक बोलणारा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेला तात्काळ अटक करा. तसेच पत्रकार संरक्षक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी.
अशी मागणी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड तालुक्याच्या वतीने यवत पोलीस स्टेशन येथे निवेदन द्वारे करण्यात आले आहे. यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, उपाध्यक्ष संदीप भालेराव, सचिव राहुलकुमार अवचट, अनिल गायकवाड, दत्तात्रय डाडर, आदित्य बारवकर, अविनाश लोंढे, बाळासाहेब मूळीक आदी पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान याबाबत लोणी काळभोर येथून बोलताना प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि पुणे प्राईम न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक जनार्दन दांडगे म्हणाले की, बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर लोकभावनेचा अनादर करणारे वक्तव्य बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केले आहे. एवढंच नव्हे तर, “तू अशा बातम्या देत आहेस, की जणू काही अत्याचार तुझ्यावरच झाला आहे,” असे एका महिला पत्रकाराविषयी केलेले वक्तव्य अशोभनीय आहे. त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. तसेच वामन म्हात्रे यांनी समोर येत संबंधित पत्रकाराची जाहीर माफी देखील मागावी.