बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा 2016 मध्ये झाली परंतु या प्रकल्पास बाधित गावांचा कडाडून विरोध झाल्यामुळे हा प्रकल्प अडकून पडला. या प्रकल्पामुळे पुरंदरचे राजकारण चांगलेच तापले होते. आज देखील तशीच काही परिस्थिती अनुभवास मिळत आहे. तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील विमानतळ बाधित 7 गावे यांचा विमानतळास आज देखील कडाडून विरोध आहे .त्यामुळे तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजणार आणि वाजणार आहे.
याबाबत विमानतळ बाधित गावांपैकी खानवडी गावचे उपसरपंच यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावरती असे प्रतिक्रिया दिली की, विमानतळ बाधित गावांचा या प्रकल्पास जमीन देण्यास कडाडून विरोध आहे. हा लढा आम्ही गेली आठ वर्षे अविरतपणे लढत आहे. शेतकऱ्यांचा हा विरोध दर्शविण्यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, काळे झेंडे लावून पाडवा साजरा करणे, अशा प्रकारे विरोध करण्यात आलेला आहे. आज देखील या गावांमध्ये या प्रकल्पास जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा माता-भगिनींचा ज्येष्ठ तरुण सर्वांचाच कडाडून विरोध आहे.
जमिनी या आमच्या हक्काच्या असून जमिनीशी आमची शेतकऱ्याची नाळ जोडलेली असल्याने, हा मुद्दा अतिशय संवेदनशील व भावनिक आहे. शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. या जमिनी आमचे वाडवडील, पूर्वज यांच्याकडून आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. पुरंदर उपसा सिंचन पाण्यामुळे आम्ही शेती बहरास आणली आहे. या जमिनीमध्ये आमचे घरे वास्तव्य आहे. आमचे वाडवडील याच घरात याच मातीत घडले. या सर्वांच्या आठवणी आणि वारसाचे प्रतीक म्हणजे आमची ही काळी आई आणि आमचे हे अस्तित्व पुसून दुसऱ्या ठिकाणी जाणे शेतकरी कदापी सहन करणार नाहीत. प्रत्येकासाठी आपली जमीन, आपला गाव हे अस्तित्व असते, गावाबाहेर देखील आपण आपल्या गावाची ओळख सांगतो.
राजकारणी व्यक्तीला देखील त्याची ओळख आणि अस्तित्व त्याच्या गावामुळे मिळते. आमच्या या विमानतळ प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध आहे आणि तो आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करू. जो उमेदवार या लढ्यात आमच्यासोबत उभा राहील गाव त्याच्याच मागे भक्कमपणे उभे राहणार आणि त्यालाच मतदान करणार आहे. अशी माहिती उपसरपंच स्वप्निल होले यांनी सांगितले की ७ गावांमध्ये याठिकाणी जे विमानतल होत आहे. त्याला जो उमेदवार विरोध करेल त्यालाच सात गावातील नागरीक मतदान करणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.