विजय कोलते
सासवड : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखा यांचे संयुक्त विद्यमाने २७ वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड येथे होणार आहे. अशी माहिती आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली आहे.
या संमेलनाचे उद्घाटन मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ नाट्य व चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक सुनीताराजे पवार असून स्वागताध्यक्ष गुरुकुल करिअर ॲकॅडमी, सासवड चे प्राचार्य संदीप चंद्रकांत टिळेकर आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, जेष्ठ विधीज्ञ ॲड. राजेंद्र पै व माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे उपस्थित राहणार आहेत.
एक दिवसीय होणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद, पुरंदर कलामंच प्रस्तुत (कलाविष्कार), कवी संमेलन व समारोप या कार्यक्रमांचा समावेश आहे. कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ कवी वात्रटीकाकार रामदास फुटाणे उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब खाडे यांनी दिली. साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे उपाध्यक्ष बंडूकाका जगताप यांनी केले आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण, शिवाजी घोगरे, ॲड.कला फडतरे, ॲड. दिलीप निरगुडे, ॲड.अशपाक बागवान, सतीश पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.