भिगवण, (पुणे) : भिगवण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, अवघ्या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत मदनवाडी येथील जमिनीच्या वाटणीवरून आणि सह्या देण्याच्या वादातून दोन सावत्र भावांनी 65 वर्षांच्या सख्ख्या भावावर सुरीने प्राणघातक हल्ला केला. तर, दुसऱ्या घटनेत डिकसळ येथील ‘हॉटेल गिरीजा’ येथे फुकटची दारू पिऊन तिचे बिल न भरल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी गज मारून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या दोन्ही प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात नवीन भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपळे (ता. इंदापूर) येथील 65 वर्षीय वृद्ध शेतकरी लच्च्या काच्या पवार हे शनिवारी (ता. 06) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गावातील पद्मावती मंदिराच्या डाव्या बाजूने आपल्या घराकडे चालले होते. त्याचवेळी त्यांचे सावत्र भाऊ हनुमंत काशिनाथ पवार आणि रश्या काशिनाथ पवार (दोघे रा. शेटफळगढे, ता. इंदापूर) हे तिथे दबा धरून बसले होते.

वडिलांच्या मृत्यूनंतर मदनवाडी येथील 4 एकर 10 गुंठे जमिनीवरून यांच्यात वाद सुरू होता. “आम्हाला जमीन पाहिजे, तुझा या जमिनीशी काही संबंध नाही, त्यासाठी तू कागदावर सह्या कर!” असे म्हणत दोघांनी वाद उकरून काढला. हनुमंत पवार याने वृद्ध लच्च्या यांना हाताने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, तर रश्या पवार याने थेट हातातील धारदार सुरी लच्च्या यांच्या डोक्यात मारली.
दरम्यान, आवाज ऐकून पत्नी धावत आली असता दोन्ही आरोपी तिथून पळून गेले. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पीडिताने भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दुसऱ्या घटनेत रविवारी (ता. 07) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डिकसळ (ता. इंदापूर) येथील ‘हॉटेल गिरीजा’ येथे घडली. शिंग्रोबाचा माळ (ता. दौंड) येथील सेंट्रिंग कामगार महेश गणेश शिंदे (वय-29) हे या हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. तिथेच हॉटेलमध्ये काम करणारा त्यांचा गावातील मित्र पप्पू उर्फ दिलीप मोहन वाघ, त्याचा भाऊ अक्षय मोहन वाघ आणि राजू अशोक गाडे हे हजर होते. पप्पू वाघ महेशच्या जवळ आला आणि “मला पण दारू पाज” म्हणून हट्ट करू लागला. महेशने पैसे नसल्याचे सांगूनही पप्पूने स्वतःसाठी दारूची ऑर्डर दिली.
महेश शिंदे आपली दारू पिऊन काउंटरवर बिल भरण्यासाठी गेले असता, पप्पू तिथे आला आणि “माझ्या दारूचे पण बिल तूच भर” म्हणून दमदाटी करू लागला. महेशने पुन्हा नकार देताच हॉटेलच्या दरवाजापाशी पप्पू वाघ याने महेशचे गचुंडे धरले, त्यांना जबर धक्काबुक्की केली आणि थेट लोखंडी गज आणून महेश यांच्या डोक्यात आणि डाव्या हातावर प्रहार केला.
दरम्यान, यावेळी पप्पूचा भाऊ अक्षय वाघ आणि राजू गाडे यांनी हॉटेलमधून बाहेर येत महेश यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी महेश यांना बारामती येथील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत.







