लोणी काळभोर, ता. ९ : पेठ (ता. हवेली) येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधून होणाऱ्या कथित प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि नर्सरी व्यावसायिक मोठ्या संकटात सापडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. कंपनीच्या परिसरातून होणाऱ्या धूर व धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून शेती आणि नर्सरी व्यवसायालाही मोठा फटका बसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

कंपनीतून बाहेर पडणाऱ्या धूर व सूक्ष्म धुळीमुळे परिसरातील हवा दूषित होत आहे. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होत असून अनेक शेतकऱ्यांना उत्पादनात घट येत असल्याची तक्रार आहे. नर्सरी व्यवसायावरही याचा विपरीत परिणाम होत असून रोपे खराब होणे, वाढ खुंटणे आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
काही नागरिकांना सध्या श्वसनासंबंधी त्रास, खोकला, घशाची जळजळ आणि डोळ्यांची आग होण्यासारख्या समस्या जाणवत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे भविष्यात दमा, श्वसनविकार आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
शेतकरी वर्ग आर्थिक संकटात
आधीच नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गासमोर आता प्रदूषणाचे नवे संकट उभे राहिले आहे. पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई कोण करणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष देण्याची मागणी
परिसरातील वाढत्या प्रदूषणाची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, हवेच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्थानिकांचा आरोप कितपत खरा आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असून नागरिकांच्या आरोग्यापेक्षा कोणताही उद्योग मोठा असू शकत नाही, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.
पाहा व्हिडीओ:
माळवाडी परिसरातील सुमारे २०० एकरांहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. घरादारात सिमेंटची पावडर येत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रात्रीच्या वेळी कंपनीमधून मोठा आवाज येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पिकांवर सिमेंटची धूळ साचल्यामुळे शेतकरी व नर्सरी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. संबंधित काम तातडीने थांबवावे, अन्यथा पुढील दोन दिवसांत कंपनीविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.
सिद्धांत चौधरी (नर्सरी उद्योजक, सोरतापवाडी, ता. हवेली)







