दिल्ली: इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी दिल्ली प्रशासनाने एक नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांऐवजी मेट्रो आणि डीटीसी (DTC) बसने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा असून, असे केल्यास त्यांना पगारासोबत अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. ‘मेरा भारत, मेरा योगदान’ या अभियानांतर्गत हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला असून ही योजना सर्व कर्मचाऱ्यांवर बंधनकारक नसून ती पूर्णपणे ऐच्छिक आहे.

या योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

-
जे कर्मचारी आपल्या एकूण ट्रान्सपोर्ट अलाउन्सपैकी (वाहतूक भत्ता) किमान 25 टक्के रक्कम बस किंवा मेट्रो प्रवासासाठी वापरतील, त्यांना त्या अलाउन्सवर 10 टक्के अधिक रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल.
-
ही अतिरिक्त रक्कम दरमहा कर्मचाऱ्यांच्या पगारासोबत जमा केली जाईल.
-
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या भत्त्यातील 25 टक्के रक्कम डीटीसीच्या ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’मध्ये रीचार्ज करणे अनिवार्य आहे.
प्रक्रियेबाबतची माहिती:

-
योजनेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना डीटीसीतर्फे विशेष ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’ पुरवले जाईल. तसेच दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. याशिवाय दिल्ली सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.
-
संमती दिल्यानंतर, भत्त्यातील 25 टक्के रक्कम दरमहा या कार्डमध्ये आपोआप (ऑटोमॅटिक) जमा होईल.
-
उर्वरित 75 टक्के भत्ता, 10 टक्के प्रोत्साहन रक्कम आणि संपूर्ण ट्रान्सपोर्ट अलाउन्सवर मिळणारा महागाई भत्ता (DA) कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळत राहील.
सध्या ही योजना 6 महिन्यांच्या प्रायोगिक कालावधीसाठी सुरू करण्यात आली असून, त्यानंतर तिच्या परिणामांचे मूल्यमापन केले जाणार आहे.







