पुणे : अनधिकृत पानटपरीवर कारवाई न करण्याच्या बदल्यात लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून खराडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आकाश अरुण मुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पानटपरी चालकाकडे ५०० रुपयांची मागणी करून त्यातील ३०० रुपये स्वीकारल्याचा आरोप मुळे यांच्यावर आहे.

आकाश मुळे यांची ३१ ऑगस्टच्या रात्रीपासून १ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत झेन्सार रोड परिसरातील अनधिकृत आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी ड्युटी लावण्यात आली होती. याचदरम्यान झेन्सार आयटी पार्कसमोर असलेल्या एका पानटपरी चालकाकडून त्यांनी कथितरित्या लाचेची मागणी केली.

पानटपरीवर कारवाई न करण्यासाठी ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर ३०० रुपये स्वीकारल्याचा आरोप मुळे यांच्यावर करण्यात आला. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर संबंधित प्रकरणाची प्राथमिक विभागीय चौकशी करण्यात आली.

चौकशीनंतर पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांनी आकाश मुळे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. ड्युटीवर असताना पैशांची मागणी करणे आणि ते स्वीकारणे ही गंभीर स्वरूपाची शिस्तभंगाची बाब असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पोलीस कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारचे वर्तन झाल्यास पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विभागीय चौकशीनंतर मुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या काळात आकाश मुळे यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. तसेच निलंबनाच्या कालावधीत मुख्यालय सोडण्यासाठी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेणे आणि दररोज हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.







