मुंबई: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. आयोगाच्या स्थापनेला लवकरच एक वर्ष पूर्ण होणार असून, विविध कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता आयोगाकडून पुढील नोटिफिकेशन कधी जारी केले जाणार, याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पॅनेलच्या मुंबई दौऱ्याचे आयोजन २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या दौऱ्यात कर्मचारी संघटना, विविध संस्था आणि पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जात आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरील ‘What’s New’ या विभागानुसार, मुंबई दौऱ्याबाबतची सूचना २१ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

यापूर्वी आयोगाच्या बंगळुरू दौऱ्यासंदर्भात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सूचना जारी करण्यात आली होती. बंगळुरूमध्ये ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी बैठका नियोजित करण्यात आल्या होत्या. विविध घटकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या आणि सूचना जाणून घेण्याची प्रक्रिया आयोगाकडून सुरू आहे.

आठव्या वेतन आयोगाकडून पुढील नोटिफिकेशन कधी जारी होणार, हा सध्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. दिवाळीपूर्वी आयोगाकडून नवीन सूचना प्रसिद्ध होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आगामी बैठका, सल्लामसलती किंवा आयोगाच्या कामकाजासंदर्भातील माहिती नवीन नोटिफिकेशनद्वारे दिली जाऊ शकते. त्यामुळे अधिकृत सूचना प्रसिद्ध होईपर्यंत कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
केंद्र सरकारने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेला मंजुरी दिली होती. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाला स्थापनेपासून १८ महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी सादर करायच्या आहेत. या कालमर्यादेनुसार आयोगाचा अहवाल मे २०२७ च्या आसपास सादर होण्याची अपेक्षा आहे.
मात्र, शिफारशी सादर होणे आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. वेतनवाढ, पेन्शनमधील बदल आणि नवीन वेतनरचना कधी लागू होणार, याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या पुढील घोषणांवर अवलंबून असेल. त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या अधिकृत अपडेटकडे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.







