रायगड: रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात खाणकामावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष सुनील थळे यांचे धाकटे बंधू विजय थळे (वय ५०) यांची पोकलेनच्या ब्रेकरने डोक्यात प्रहार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मापगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी निकेश दळवी आणि आशिष दळवी या दोघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही संशयित विजय थळे यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या पाच तासांत दोघांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील टाकादेवी मंदिर परिसरातील एका खाणीत माती आणि दगडाचे खोदकाम सुरू होते. बहिरोळे येथील निकेश दळवी आणि आशिष दळवी हे दोघे या ठिकाणी खोदकाम करत होते. या खोदकामाबाबत विजय थळे यांनी सुमारे आठ दिवसांपूर्वी दोघांकडे विचारणा केली होती. विनापरवानगी दगड-मातीचे खोदकाम करून त्याची विक्री करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला होता.

बुधवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी विजय थळे पुन्हा खाणीच्या ठिकाणी गेले. त्यावेळी निकेश आणि आशिष हे पोकलेनच्या मदतीने दगड फोडण्याचे काम करत होते. याचवेळी पुन्हा वाद झाला. या वादादरम्यान पोकलेनच्या ब्रेकरने विजय थळे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या हल्ल्यात विजय थळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर दोन्ही संशयित आरोपी तेथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अलिबाग पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दोघांना अवघ्या पाच तासांत अटक केली.
खाणकामावरून सुरू झालेला वाद एवढ्या टोकाला कसा पोहोचला, विजय थळे यांच्यावर नेमका कोणत्या परिस्थितीत हल्ला झाला आणि या हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासात हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे.







