पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि आवाजाच्या दणदणाटाला ठाम विरोध करणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्याची मुख्यमंत्री देवेद फडणवीस यांनी दखल घेतली आहे.

गृहमंत्रालय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांच्या सुरक्षेचे तातडीने निर्देश दिले आहेत. पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या आदेशानंतर बापट यांना चोवीस तास पोलीस संरक्षण पुरवण्यात येत आहे. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

गणेशोत्सवात लाऊडस्पीकर आणि डीजे सिस्टीमवर बंदी घालण्यात यावी, अशी आग्रही भूमिका बापट यांनी मांडली होती. त्यांच्या या भूमिकेला अनेक पुणेकरांनी पाठिंबा दिला होता, तर काही घटकांकडून त्यांना विरोधही होत होता. या मुद्द्यावर माध्यमांना मुलाखत देत असतानाच त्यांच्यावर ही मारहाण झाली. या घटनेनंतर विविध राजकीय पक्ष, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी या हिंसाचाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

दरम्यान बापट यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपीला लगेचच ताब्यात घेतले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.







