भिवंडी: भिवंडी महानगरपालिकेत पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईने संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्रभाग समिती क्रमांक 3 चे प्रभारी सहाय्यकांना अडीच लाख रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभाग समिती 3 च्या हद्दीत एका ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू होते. हे बांधकाम तोडू नये आणि कोणतीही कायदेशीर कारवाई टाळावी, यासाठी भोईर यांनी तक्रारदाराकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र भोईर (वय 52) हे इमारत निरीक्षक असून, त्यांच्याकडे सहाय्यक आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, चर्चेनंतर लाचेची रक्कम 2 लाख 50 हजार रुपये ठरली. मात्र, तक्रारदाराने ठाणे एसीबी कार्यालयात याबद्दल तक्रार नोंदवली.

तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने सापळा रचला. प्रभाग समिती कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या आपल्या वैयक्तिक ‘क्रेटा’ कारमध्ये बसून सुरेंद्र भोईर तक्रारदाराकडून अडीच लाख रुपये घेत असताना, पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर चौकशी करण्यात आली आणि पहाटेच्या सुमारास त्यांना औपचारिकपणे अटक करण्यात आली.







