मुंबई: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला आहे. ‘आता सगळं उघड होणार!’ या सूचक टॅगलाईनने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या टीझरने चित्रपटसृष्टी आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

नाशिक येथील अशोक खरात याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार काही काळापूर्वी उघड झाला होता. या प्रकरणाशी राज्यातील अनेक बडे नेते आणि अधिकारी यांचे संबंध असल्याचे आरोप झाले होते. या सर्व घटनाक्रमावर हा चित्रपट भाष्य करणार आहे.

टीझरमध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा लूक सध्या विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. चाकणकर यांचा खरातच्या डोक्यावर छत्री धरलेला प्रसंग चित्रीत करण्यात आला आहे, जो टीझरमध्ये दिसून येतो.
या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली आहे, तर पटकथा आणि संवादाची जबाबदारी संजय नवगिरे यांनी पार पाडली आहे. कलाकारांची नावे सध्या गुप्त असली तरी, हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याने प्रेक्षकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट अनेकांचे मुखवटे उतरवेल, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.







