पुणे: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी घडलेल्या केतन अग्रवाल या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आता एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. सुरुवातीला हा एक अपघात वाटत असला तरी, पोलिसांच्या तपासात ही एक नियोजित हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती, तिथे आता दुःखाचे वातावरण पसरले आहे. व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन याच्या हत्येमागे त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचा हात असल्याचे उघड झाले आहे.

पोलीस तपासात या हत्येचे अत्यंत क्रूर स्वरूप समोर आले आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिने चौकशीदरम्यान हत्येचा संपूर्ण कट सांगितला. सिया आणि चेतन यांनी केतनला संपवण्यासाठी एक गुप्त सांकेतिक भाषा ठरवली होती. सियाने चेतनला सांगितले होते की, “जेव्हा आपण किल्ल्यावर असू आणि मी अचानक खाली वाकेन, तेव्हा तू समजून जायचे की केतनला दरीत ढकलण्याची तीच योग्य वेळ आहे.”. 18 जून रोजी किल्ल्यावर असताना सियाने ठरल्याप्रमाणे इशारा दिला आणि चेतनने केतनला दरीत ढकलून ठार केले.

तपासातून अशीही माहिती मिळाली आहे की, सिया ही 12 वी नापास आहे आणि तिला अनेक व्यसनही होते. या आधीही तिला अनेक बॉयफ्रेंड राहिले असल्याचे समोर आले आहे. तिच्या वागण्यामुळे पालक त्रस्त होते, म्हणून तिचे आयुष्य स्थिरावेल या आशेने त्यांनी तिचे लग्न सुशिक्षित आणि श्रीमंत घराण्यातील केतनसोबत ठरवले होते.
सियाला हे लग्न मान्य नव्हते, म्हणून तिने केतनची हत्या केली. सध्या हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.







