आदित्य बोराटे

इंदापूर: अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर कारवाईच्या धास्तीने इंदापूर-अकलूज संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत बाजार समितीच्या रस्त्याशेजारील शेतात अज्ञात व्यक्तींनी टँकरमधून हजारो लिटर संशयित भेसळयुक्त दूध ओतून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वडापुरीकडे जाणाऱ्या बाजार समितीच्या रस्त्यालगत असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणावर दूध सोडण्यात आले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे हे दूध नासल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरली असून, शेजारील शेतकरी आणि नागरिकांना ये-जा करताना नाकाला रूमाल लावावा लागत आहे.
सध्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून दूध आणि खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात विशेष मोहीम राबविली जात आहे. या कारवाईच्या भीतीने भेसळयुक्त दूध नष्ट करण्यासाठी ते टँकरमधून शेतात ओतण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हे दूध कोणत्या डेअरीचे होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.






