सागर जगदाळे
भिगवण, (पुणे) : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ स्वामी चिंचोली येथील सकल मराठा समाजाच्या वतीने लावलेल्या ‘गाव बंदी’ बोर्डवर लावलेल्या मनोज जरांगे यांच्या फोटोवर अज्ञात समाजकंटकांनी काळी शाई फेकली आहे. तसेच बोर्डवरील मराठा योद्धा जरांगे पाटील यांचा फोटो फाडला आहे.
समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी हे कृत्य केले आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या अंबड येथील सभेमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केल्याचे मत नागरिकांनी नोंदवले असून, याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे निवेदन स्वामी चिंचोली येथील सकल मराठा समाजाच्यावतीने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथील सभेमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे अज्ञात समाजकंटकांनी बोर्डवर मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोवर काळी शाई फेकून बोर्डवरील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा फोटो फाडला आहे. हा फोटो समाजकंटक रात्रीच्या वेळी घेऊन गेले आहेत. स्वामी चिंचोली गावामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची शाखा गेले पंधरा दिवसांपूर्वी स्थापन केली आहे. या शाखेचा बोर्ड देखील समाजकंटकाने वाकवला आहे.
परिणामी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध तसेच अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करून, तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी स्वामी चिंचोली सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. मागणीची दखल न घेतल्यास, सनदशीर मार्गाने २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वामी चिंचोली पाटी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे निवेदन स्वामी चिंचोली येथील सकल मराठा समाजाच्यावतीने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. निवेदन स्वीकारताना पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध आम्ही तत्काळ कायदेशीर कार्यवाही करू, सर्वांनी शांतता बाळगावी, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.