पिंपरी-चिंचवड : प्रेमसंबंधात निर्माण झालेला संशय आणि त्यातून होणारा मानसिक त्रास एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना चिंचोली परिसरात घडली आहे. सततच्या त्रासामुळे या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी 21 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल हनुमंत दणाणे (वय 21, रा. देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. साहिल आणि संबंधित अल्पवयीन मुलीची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये फोनवरून नियमित संवाद सुरू झाला आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले.

मात्र, काही काळानंतर साहिलकडून मुलीवर वारंवार संशय घेतला जात असल्याचा आरोप आहे. या संशयातून तिच्यावर मानसिक दबाव आणला जात होता. तसेच धमक्या देणे आणि त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सततच्या मानसिक तणावामुळे मुलगी त्रस्त झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

मुलीच्या आईने या घटनेनंतर देहूरोड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी साहिल दणाणेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीला मानसिक त्रास देणे, धमकावणे आणि तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी साहिलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.







