कोल्हापूर : सरनोबतवाडी परिसरात 24 वर्षीय विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या दीराला अटक केली आहे. रुक्मिणी साहनी असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणात श्रीमंधर बसंत साहनी याला पोलिसांनी विक्रमनगर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत दीर-भावजयीमधील कथित अनैतिक संबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

साहनी कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर येथील असून, सध्या उचगाव परिसरात राहत होते. रुक्मिणीचा पती धर्मेंद्रकुमार साहनी फरशी फिटिंगचे काम करतो. श्रीमंधर हा सरनोबतवाडी भागात भाड्याच्या घरात राहत होता.

3 ऑगस्ट रोजी धर्मेंद्रकुमार कामानिमित्त कणेरी मठ परिसरात गेला होता. त्यावेळी रुक्मिणी श्रीमंधरच्या घरी गेली होती. तेथे दोघांमध्ये वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. वाद वाढल्यानंतर श्रीमंधरने रुक्मिणीच्या डोक्यावर हातोड्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विक्रमनगर परिसरात सापळा रचला आणि श्रीमंधरला अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत दोघांमध्ये कथित अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. तसेच श्रीमंधरचे लग्न रुक्मिणीच्या लहान बहिणीशी ठरल्याचेही सांगण्यात आले आहे. या विषयावरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 3 ऑगस्टला झालेल्या वादानंतर रागाच्या भरात हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी श्रीमंधरला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.







