पुणे: ऑनलाइन डेटिंग अॅपवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. 22 वर्षीय तरुणाला भेटण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी बोलावून त्याच्यावर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडून पैसेही काढून घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाची गे डेटिंग अॅपवर एका तरुणाशी ओळख झाली होती. काही काळ ऑनलाइन संवाद झाल्यानंतर संबंधित तरुणाने भेटण्याचे ठरवले. यासाठी त्याला एका निर्जन ठिकाणी बोलावण्यात आले. पीडित तरुण तेथे पोहोचल्यानंतर त्याला एका पडक्या वसाहतीमधील खोलीत नेण्यात आले.

आरोप आहे की, तेथे आधीपासून दोन साथीदार उपस्थित होते. तिघांनी मिळून तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्याला धमकावत मोबाईलमधील PhonePe अॅपचा PIN विचारण्यात आला. घाबरलेल्या तरुणाकडून PIN मिळवल्यानंतर त्याच्या बँक खात्यातून 20 हजार रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपींनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे सुरुवातीला तो घाबरला होता. मात्र, अखेर त्याने धाडस करून येरवडा पोलिसांकडे धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.
तक्रारीनंतर पोलिसांनी देवेंद्र, अरबाज आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.






