रायगड : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. संतोष रामचंद्र ननावरे (वय ३६) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते वाहतूक शाखेत कार्यरत होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

संतोष ननावरे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे रहिवासी होते. ते चार दिवसांपूर्वी कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, ते मुंबई-गोवा महामार्गावरील काळकाई हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जोगळे लॉजमध्ये वास्तव्यास असल्याचे समोर आले.

शुक्रवारी सकाळी लॉजमधील कर्मचारी नेहमीप्रमाणे ननावरे यांच्या खोलीत आंघोळीचे पाणी देण्यासाठी गेला. त्याने दरवाजा ठोठावून हाका मारल्या, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने कर्मचाऱ्याने खिडकीतून आत पाहिले असता ननावरे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर लॉज कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलादपूर पोलिसांना माहिती दिली.

पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांना माहिती देऊन त्यांच्या उपस्थितीत खोलीचा दरवाजा उघडण्यात आला आणि मृतदेह खाली उतरवण्यात आला. पोलिसांनी खोलीची पाहणी केली असता एक सुसाईड नोट आढळून आली. पत्नी नांदायला येत नसल्याने दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचा आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे हे पाऊल उचलल्याचा उल्लेख चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी महाडचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप काळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनीही भेट देऊन पाहणी केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुक्रवारी रात्री उशिरा ओझर्डे या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार पुढील तपास करत आहेत.







