पुणे : पुणे शहरात अवघ्या 22 तासांत 123 मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करणारी एक ऑडिओ क्लिप आणि सोशल मीडिया रील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुणे पोलिसांनी हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या ऑडिओ क्लिपची पोलिसांनी स्वतः पडताळणी केली. ही क्लिप तयार करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून पोलिसांनी माहिती घेतली. यासोबतच संबंधित सोसायटीतील पदाधिकारी, व्यवस्थापन, शेजारी आणि इतर व्यक्तींकडूनही या दाव्याबाबत चौकशी करण्यात आली.

या तपासणीत पुणे शहरात गेल्या 22 तासांत 123 मुलींचे अपहरण झाल्याचे सांगणाऱ्या दाव्याला कोणताही ठोस आधार मिळाला नाही. अशा प्रकारची अधिकृत नोंद किंवा विश्वासार्ह पुरावा पोलिसांच्या तपासात आढळून आलेला नाही. त्यामुळे व्हायरल होत असलेली रील आणि ऑडिओ क्लिप तथ्यहीन व निराधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान काही नवीन माहिती किंवा पुरावे समोर आल्यास त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अप्रमाणित माहिती वेगाने पसरल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही पोस्ट, ऑडिओ किंवा व्हिडिओ खातरजमा न करता इतरांना पाठवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
महिला आणि मुलींच्या सुरक्षेला पुणे पोलिसांकडून प्राधान्य दिले जात असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद किंवा प्रत्यक्ष घटना आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच माहिती मिळवण्यासाठी केवळ पुणे पोलिसांच्या अधिकृत आणि सत्यापित माध्यमांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






