बारामती : देशात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याच मतदान पार पडलं. या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश होता. दरम्यान, बारामती मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत बँकेची शाखा सुरू ठेवणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे
बारामती मतदारसंघात येणाऱ्या भोर तालुक्यातील वेल्हे येथील बँकेची शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केला होता. त्यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील टाकला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषी आढळल्याने आयोगाने व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे .
त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने याबाबाबतच्या तक्रारीनंतर त्याच रात्री बँकेच्या शाखेत जाऊन पाहणी केली होती . त्यावेळी बँकेत ४० ते ५० जण असल्याचे भरारी पथकाला आढळून आले होते. त्या अनुषंगाने बँकेतील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. त्यामध्ये काही लोक शाखा व्यस्थापकाच्या केबिनमध्ये आत-बाहेर करत असल्याचे निदर्शनास आले.