बारामती : लोकसभा निवडणुक मतदानाच्या आदल्या दिवशी (आज) बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या चार तालुक्यांमध्ये संवेदनशील स्थिती असून या तालुक्यांतील मतदान केंद्रांवर कॅमेऱ्यांचीही व्यवस्था केली जावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड आणि खडकवासला या तालुक्यांमध्ये मतदान प्रक्रियेवेळी गैरप्रकार होऊ शकतात. हे प्रकार रोखण्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना कॅमेरेही उपलब्ध असावेत, तसेच पोलीस प्रशासनानेही अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवावा, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
बारामती लोकसभा मतदारसंघात दीडशेहून अधिक मतदारसंघ संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय घेण्यात यावे. तसेच संवेदनशील मतदान केंद्रावर काही गैरप्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असं सुप्रिया सुळे यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच संवेदनशील मतदान केंद्रावर अधिक लक्ष ठेवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.