जेजुरी : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी येथे फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईड केली. बाराशे फूट उंचीवरून त्यांनी जयाद्री पर्वत रांगांतील खंडोबा मंदिर, जेजुरीचे कडेपठार, ऐतिहासिक होळकर तलाव व निसर्गरम्य कडेपठारचा डोंगर पाहिला. या वेळी रायडर्ससोबत त्यांनी फोटोसेशन देखील केले. जेजुरीची सफर झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला.
खासदार सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या महाविद्यालयाच्या जवळच असणाऱ्या कडेपठारजवळ सेवानिवृत्त पायलट रामचंद्र काकडे यांनी पर्यटकांसाठी पॅरामोटरिंग सेंटर उभारले आहे. या फ्लाईंग रायनो पॅरामोटरिंग अॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरला त्यांनी भेट दिली.
पॅरामोटरमध्ये बसून जमिनीपासून १२०० फुटांवरून खंडोबा मंदिर, कडेपठार मंदिर व निसर्गरम्य परिसर पाहिला. जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनाबरोबरच पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथे येणारे अनेक जण या पॅरामोटरिंग सफरीचा आनंद घेतील, असा आशावद त्यांनी व्यक्त केला. जेजुरीच्या डोंगर परिसरातील सफर झाल्यावर त्यांनी केंद्राचे संचालक काकडे यांचे कौतुक केले.
कडेपठारच्या डोंगर रस्त्यावर पाच महिन्यांपूर्वी हे पॅरामोटरिंग सेंटर सुरू झाले आहे. पॅरामोटर स्पेनवरून आणली असून, याला जगात प्रसिद्ध असलेल्या रोटॅक्स कंपनीचे इंजिन बसवले आहे. विमान चालवण्याचे काम सेवानिवृत्त पायलट चंद्रकांत महाडिक करतात. वातावरणातील अनुकूलता पाहूनच पर्यटकांना रायडिंगसाठी नेण्यात येते. अनेक जण या पॅरामोटरिंग सफरीचा आनंद घेत आहेत.