Supriya Sule On Parth Pawar : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पार्थ पवार यांच्या कंपनीला कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) माफ करण्यात आल्याचा आणि ‘महार वतना’ची जमीन नियमबाह्य पद्धतीने खरेदी केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मात्र भाचा पार्थ पवार यांची पाठराखण करत सरकारलाच धारेवर धरले आहे.

‘माझा पार्थवर पूर्ण विश्वास’ (Supriya Sule On Parth Pawar)
सुप्रिया सुळे यांनी आज सकाळीच पार्थ पवार यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे सांगत, त्यांचा पार्थवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. “माझा पार्थ पवार याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आज सकाळीच मी त्याच्यासोबत फोनवर बोलले. त्याने मला सांगितले की, ‘आत्या मी काहीही चूक केलेली नाही.’ त्यामुळे ज्या बातम्या येत आहेत, त्या दिशाभूल करणाऱ्या आहेत.”
– सुप्रिया सुळे, खासदार
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे
या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले असले तरी, सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या कृतीवर शंका व्यक्त केली आहे. अजित पवार किंवा पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणातील तथ्य राज्यासमोर मांडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुळे यांनी प्रशासकीय कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी “मी सहीच केली नाही, दस्तही पाहिला नाही” असे माध्यमांना सांगितल्यानंतरही त्यांचे निलंबन कशासाठी, असा थेट सवाल आता सुळे यांनी उपस्थित केला आहे.
तहसीलदारावर अन्याय नाही का?
“तहसीलदार सहीच केली नाही म्हणत असताना, तुम्ही त्यांना कामावरून का काढले? हा गरीब तहसीलदारावर अन्याय नाही का? सरकार म्हणते जमीन विकता येत नाही आणि दुसरीकडे मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस येते. हे सगळ गोलमाल आहे. सरकार नक्की कोण चालवत आहे आणि निर्णय प्रक्रियेत कोण आहे? मुद्रांक शुल्क भरला आहे की नाही, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी .” असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तहसीलदारांचे निलंबन मागे घ्या; सुळे
या संपूर्ण प्रकरणामागे अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. पार्थ पवार यांचा या व्यवहाराशी संबंध नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्याला बळीचा बकरा बनवू नये आणि तहसीलदार येवले यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.







