गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रक, टॅक्टर-ट्रॉली, छकडी, बैलगाडी आदी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रस्त्यावरून ऊस भरून जाणारी वाहने रात्रीच्या वेळी रिप्लेक्टर अभावी दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. परिणामी वाढत्या अपघातामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सर्वच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर बसविण्याची मागणी होत आहे. यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्याण्याची गरज आहे.
दरम्यान, तालुक्यातील सगळ्या साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू आहे. साखर कारखाना किंवा गु-हाळ घरे यांना ट्रक, टॅक्टर-ट्रॉली, छकडी, बैलगाडी आदी वाहनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरु आहे. अनेक वाहनांना रिप्लेक्टर किंवा रेडियम लावले नसल्यामुळे ऊस भरून जाणारी वाहने रात्रीच्यावेळी दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणारी वाहने नादुरुस्त किंवा काही कारणांनी रस्त्यावर थांबून राहतात. पाठीमागून येणार्या वाहनांना रात्री ही वाहने दिसत नसल्यामुळे अनेकवेळा अपघात घडले आहेत. तसेच बैलगाड्यांना स्वयंप्रकाशित होईल, अशी कोणतीही व्यवस्था नसते. बैलगाड्यांचा वेगही मर्यादित असतो. त्यामुळे मागून येणाऱ्या सुसाट वाहनांचा वेग अचानक कमी करताना चालकांना कसरत करावी लागते. यामुळे देखील अपघात घडतात. यामुळे बैलगाडीसह सर्व ऊस वाहतूक करणार्या वाहनांना रिप्लेक्टर, रेडियम लावण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.
त्याचबरोबर ऊस वाहतूक करणारे विशेषतः टॅक्टर चालक मोठ्या आवाजात गाणी लावून वाहने चालवतात. उसाची ओव्हर लोड वाहतूक करतात. त्यामुळे वाहने पलटी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे त्यावर ही कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधित साखर कारखाने आणि आरटीओ विभागाने त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी देखील होत आहे.
अनेक ऊस वाहतूक करणार्या वाहनांना रिप्लेक्टर नसल्यामुळे अपघात घडत आहेत. वाहन चालकांना रात्री ऊस वाहतूक करणरे वाहने जवळ आल्याशिवाय दिसत नाहीत. त्यामुळे सर्व ऊस वाहतूक करणार्या वाहनांना रिप्लेक्टर बसविणे गरजेचे आहे. संबंधित साखर कारखान्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– संजय थोरात (अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड)