हडपसर, (पुणे) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे हडपसर येथील नामांकित एस. एम. जोशी महाविद्यालय प्रशासकीय भोंगळ कारभारासमोर आला आहे. बी. कॉम. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा व प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी भल्या पहाटेपासून तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असून, संबंधित कर्मचाऱ्यांच्या मुजोर आणि उशिरा येण्याच्या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाने फॉर्म जमा करण्यासाठी सकाळी साडेदहाची वेळ अधिकृतपणे दिली होती. हा फॉर्म वेळेत जमा व्हावा यासाठी शेकडो विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनी पहाटे सहा वाजेपासूनच महाविद्यालयाच्या आवारात रांगेत उभ्या होत्या.

मात्र, विद्यार्थ्यांच्या या त्रासाशी काहीही देणेघेणे नसल्यासारख्या संबंधित महिला कर्मचारी/प्राध्यापक सकाळी साडेदहा ची वेळ असताना निवांत अकरा वाजता ऑफिसमध्ये दाखल झाल्या. वेळेत न येता उलट उशिरा आल्यावर विद्यार्थ्यांना विविध क्षुल्लक कारणे सांगून, फॉर्ममध्ये चुका काढून माघारी धाडले जात असल्याचा संतापजनक प्रकार घडत आहे.

विद्यार्थ्यांची संख्या शेकड्यांच्या घरात असताना फॉर्म स्वीकारण्यासाठी महाविद्यालयाने केवळ एकच टेबल (काउंटर) उपलब्ध करून दिले आहे. यामुळे रांगेतील गर्दी प्रचंड वाढली असून एका विद्यार्थ्याचा फॉर्म तपासण्यासाठी अत्यंत संथ गतीने काम सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, रांगेत पहाटेपासून उभ्या असलेल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवून, ज्यांचा ‘वशिला’ किंवा वरीष्ठ स्तरावरून फोन येतोय, अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म रांग न लावता थेट आणि तात्काळ स्वीकारले जात असल्याचा खळबळजनक आरोप रांगेत ताटकळणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, हडपसर परिसरातील अत्यंत नावाजलेल्या संस्थेच्या या महाविद्यालयात असा पक्षपाती आणि बेजबाबदार कारभार सुरू असल्याने पालक आणि संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.







