सोलापूर : सोलापूर शहरातील शांतीनगर परिसरात गुरुवारी सकाळी एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पाण्याच्या टाकीजवळ हा तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळून आला. प्राथमिक तपासात शरीरावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी हत्या झाल्याच्या संशयाने तपास सुरू केला आहे.

मृत तरुणाची ओळख उमर मौलाली बिराजदार (वय 22, रा. सिद्धेश्वर गांधी नगर, मठाजवळ, सोलापूर) अशी झाली आहे. त्याच्या शेजारी त्याची दुचाकीही पडलेली होती. सकाळी 9 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिराजदार तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास जलद गतीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दरम्यान, उमरचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता. आणखी 3 ते 4 महिन्यांत त्याचे लग्न होणार होते. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच त्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.जुन्या वादातून हा प्रकार घडला की अन्य कोणते कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.






