लोणी काळभोर, ता. ६ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरातील हिरा लॉज पार्किंगमध्ये उभी असलेल्या कारला दुसऱ्या कारने धडक दिल्याची घटना घडली असून, संबंधित चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

याप्रकरणी रोहण बळीराम पवार (वय २८, रा. अंबरनाथ विश्व कॉलनी, रामदरा मंदिर रोड, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास’ (पूर्ण नाव, व पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री हडपसरहून घरी परतत होते. रात्री सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास वडिलांचा फोन आल्याने त्यांनी कदमवाकवस्ती येथील हिरा लॉजच्या पार्किंगमध्ये आपली मारुती सुझुकी स्विफ्ट (क्र. HP 12 E 9021) उभी केली आणि फोनवर बोलण्यासाठी वाहनाबाहेर उतरले.

यावेळी शेजारी उभी असलेली हुंडाई आय-20 (क्र. MH 12 KE 1876) ही कार चालकाने अचानक मागे घेतल्याने ती थेट पवार यांच्या कारला धडकली. या धडकेत स्विफ्ट कारचा डावा दरवाजा आणि फेंडरचे नुकसान झाले. धडक दिल्यानंतर संबंधित चालकाकडे विचारणा केली असता त्याने आपले नाव ‘विलास’ असे सांगितले. त्याच्याशी बोलत असताना तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा संशय आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

दरम्यान, या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी वाहनाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.






