बारामती(पुणे) : राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाज बांधव आक्रमक झाला आहे. त्यासाठी उपोषण, आंदोलन केले जात आहे. असे असताना आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही झाला आहे. याच आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.(Ajit Pawar)
धनगर समाज बांधवांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे निवासस्थान असलेल्या बारामती शहरातील सहयोग सोसायटीसमोर ठिय्या आंदोलन केले. आरक्षणाच्या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे पाटील यांचे गेल्या 11 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, अद्यापही राज्य सरकारमधील जबाबदार मंत्री आंदोलनाच्या ठिकाणी येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच प्रत्येक आमदार, खासदाराच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Maratha Reservation Protest)
त्यानुसार, अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाजातील कार्यकर्ते आंदोलनासाठी एकत्रित आले होते. मात्र, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सहयोग भवन सोसायटीच्या समोर आंदोलन करण्यास पोलिसांनी विरोध केला. यावेळी ‘बाहेर निघा, बाहेर निघा, अजित पवार बाहेर निघा !, या लोकप्रतिनिधीचं करायचं काय?…’ यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.(Maratha Reservation)
ग्रामीण भागात रास्ता रोको, कॅंडल मार्चही…
शहरातील प्रशासकीय भवनसमोर वाघमोडे यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी आजपर्यंत ग्रामीण भागात रास्ता रोको, कॅंडल मार्च, बारामती शहर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यानंतर आता अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.(Dhangar Reservation Protest)